विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर बिनविरोध, ठाकरेंच्या उमेदवाराची माघार

Foto
मुंबई :विधान परिषदेत उपसभापतीपदाच्या निवडणुकीत मोठे नाट्य पाहायला मिळाले. शिंदेसेनेकडून उमेदवार असलेल्या सचिन अहिर यांची एकमताने उपसभापतीपदी निवड करण्यात आली. ऐनवेळी उद्धवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे सचिन अहिर यांचा उपसभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला. या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान परिषदेत उपस्थित होते.

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर उद्धवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला. उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत प्रवेश केला. यानंतर लगेचच उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. तर, उद्धवसेनेकडून आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. सोमवारी झालेल्या विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेने ऐनवेळी माघार घेतली आणि सचिन अहिर यांची एकमताने निवड करण्यात आली. 

विधान परिषदेत नेमके काय घडले?

विधान परिषदेत उपसभापतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिंदेसेनेचे सचिन अहिर आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांना दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहाची इच्छा आहे की, सर्वानुमते निवड व्हावी. त्यामुळे उमेदवारी मागे घेत आहोत, अशी घोषणा केली. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती नियुक्ती झाली.

दरम्यान, उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड झाली. विरोधी पक्षाचे आभार मानतो की, त्यांनी सभागृहाचा मान राखून प्रस्ताव मागे घेतला. सन १९९९ मध्ये मी आणि सचिन अहिर सोबत निवडून आलो होतो. सचिन अहिर निर्भीडपणे काम करणारे व्यक्ती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.